Monday, May 31, 2021

राजस्थानी छाछ राबडी आणि कढी कचोरी

जयपूरला जाऊन इतकेच कसे काय खाऊन आलात असाच प्रश्न पडला असेल ना? पण काय करणार पर्यायच नव्हता. इनमिन 24 तास पण नव्हतो. त्यात सात-आठ तास झोपेत गेले. उरलेला वेळ ज्या कामासाठी गेलो होतो त्यामागे गेला. गेला बाजार तास-दिड तास तेवढा मिळाला. तेवढ्या वेळातच भटकून थोडेफार गिळता आले.

तर, जून 2019 ला टाटा प्रोजेक्ट्सच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने एक दिवसाचा जयपूर दौरा होता. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर मुंबई-जयपूर मार्गावरची सकाळची उड्डाणे बंद झाली होती, त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी निघून मुक्कामी जयपूर गाठणे क्रमप्राप्त होते. तसे निघालो. मोजून चारच पत्रकार होतो. मुक्कामाची सोय द ललितमध्ये होती. त्यादिवशी हॉटेलात एक लग्नदेखील होते. नुसता झगमगाट आणि नाचगाणी सुरु होती. पोहचायला उशिर झाल्याने बाहेर कुठे फिरणे शक्य नव्हते. हॉटेलातच जे काही होते ते गिळून गप्प पडलो. पण पंचतारांकित हॉटेलातील बंदीस्त वातानुकुलित खोलीत, अति गुबगुबीत गाद्या मला टोचतात. पहाटे लवकरच जाग आली. पटापट आंघोळ उरकली आणि भल्या सकाळीच बाहेर पडलो.

कढी-कचोरी

हॉटेलसमोरचा चार-सहा पदरी रस्ता पार करुन सरळ चालत सुटलो. पावसाचे आगमन लांबले असल्यानेच सकाळीदेखील चांगलेच गरम होत होते. शाळा शिकवणीला सायकल, बसने जाणारी मुले. अगदी डब्बा झालेल्या बसमध्ये कामावर जाणाऱ्यांची रेटारेटी अशी कोणत्याही शहरात असणारी टिपिकल दृश्य येथेपण होती.

छोट्या शहरात असतात तशी स्वतंत्र बंगला टाईप घरांची रांग होती. मर्यादीत का असेना झाडांची सोबत होती. एका चौकात रिक्षावाल्यांची रांग दिसली म्हणून मग जरा खादाडीची चौकशी केली. जवळच्याच एका चौकात बरेच गाडे असल्याचे कळले. त्या चौकात पोहचल्यावर पाहीले तर खरेच चांगलीच गर्दी होती. त्यातच दो बोटी चार रोटी 70 रु. या फलकाने लक्ष वेधून घेतले. पण त्या फलकाच्या वरच गॅरेजचा पण बॅनर होता. आणि आतमध्ये हॉटेलची लगबग फारशी दिसत नव्हती. इकडे खाल्ले तर पुढे काहीच खाता आले नसते. त्यामुळे तो मोह जरा आवरला. 

कोपऱ्यातल्या एका गाड्यावर दाल-पक्वानमधील पक्वानचा ढीग लागला होता. तेथूनच सुरुवात केली. मुगाची घट्ट डाळ, चटणी, मिरची आणि कांदा. चव काही फार ग्रेट नव्हती, पण तेवढेच सुरुवातील ठिक होते. मघाशी चालताना सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा प्रकार म्हणजे कचोरी. दोन तीन दुकानात भल्या मोठ्या कढईत कचोरी तळताना पाहीली होती. सकाळसकाळी कचोरीचे घाण्यावर घाणे निघत होते. मुंबई आणि महानगर परिसरात कोणत्याही रस्त्यावर फिरताना वडा-पाव दिसतो, तसेच हे कचोरी प्रकरण वाटू लागले.

आता या चौकात पण्डितजी चाय व कढी कचोरीवाले असा मोठा बोर्डच एका झाडावर टांगला होता. दोन मोठ्या झाड्यांच्या सावलीत एका अति छोट्या गाळ्याच्या बाहेर काचेच्या पेटीत कचोरी आणि मिरची भजी/वडे भरुन ठेवल्या होत्या. येथे नुसती कचोरी खाणारे कमीच. आधी तिचे बारीक तुकडे करायचे आणि मग प्याज कचोरी किंवा मग कढी कचोरी हे कॉम्बिनेशन ठरलेले. गरमागरम कढीत आकंठ बुडालेली कचोरी, वर गोड चटणी आणि कांदा. कढी पुन्हा मिळायची सोय आहेच. एकदोनदा कुरुंदवाड-सांगली रस्त्यावर अंकलीला कढी-वडा आणि नांदेडला कढी भजी खाल्ली होती. पण त्याव्यतिरिक्त इतक्या सकाळी कढी
कधीच खाल्ली नव्हती. जयपूरच्या त्या चौकात तर कढी-कचोरीसारखेच, कढी-मिरची वडा सदृश्य भजी असे कॉम्बिनेशन पण होते. त्या मोठ्या कचोरीचे आणि मिरचीचे तुकडे करण्यासाठी ते पंडितजी चक्क कात्रीच वापरत होते. बाकी सारे वातावरण अगदी टपरीवरचेच होते आणि बिलासाठी पंडितजींकडे पेटीएमची सुविधा पण होती.

एव्हाना बरेच तेलकट, तिखट खादाडून झाल्याने त्यावरचा उपाय अपेक्षित होता. तो तेथेच कोपऱ्यावर उभा होता. प्रो. कन्हैयालाल सैनी यांचा राजस्थानी छाछ राबडीचा गाडा. त्यावर इतके वेगवेगळे काय काय लिहले होते त्याने साहजिकच लक्ष वेधून घेतले. नींबू की शिकंजी, कैरी की छाछ वगैरे होते.

पण मला त्या छाछ राबडीचीच चव पाहायची होती. ते कन्हैयालाल त्यांच्या खास ढंगात माहीती सांगू लागले. त्यातून उमलगले ते असे, छाछ राबडी हा ज्वारी किंवा मक्याच्या कण्यापासून तयार केलेला पदार्थ. ज्वारीच्या कण्या शिजवून त्यात ताक, चाट मसाला, तिखट आणि मीठ घालून घुसळले जाते. मध्यम आकाराचा ग्लास 10 रुपयाला. घट्टसर अशी ही छाछ राबडी एक दोन ग्लास प्यायली की दुपारपर्यंत बघायलाच नको. खरे तर हा अगदी अस्सल घरगुती प्रकार आहे. लहानपणी एकदोनदा घरी मुद्दाम केलेल्या ताककण्या यावेळी आठवल्या. गरीबांचे खाद्य म्हणूनही काहीसे लहानपणी ऐकले होते. आता तेच 10 रुपयाला ग्लासभर मिळत होते.

पण हे प्रकरण भारी होते. आता गरगरीत झाले आणि परत हॉटेलात जाऊन चेकआऊटपूर्वी तिकडच्या नाश्त्यावर पण हात मारायचा होताच. त्यामुळे सरळ रिक्षा पकडली आणि हॉटेल गाठले.

संध्याकाळी चारपर्यंत द्रव्यवती नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प पाहण्यात गेला. मध्येच जेवण झाले पण ते टिपिकल कॉर्पोरेट वर्क लंच टाईप होते. संध्याकाळी एक-दिड तास शिल्लक होता म्हणून तिकडच्या प्रसिद्ध बाजारपेठेत नेण्यात आले. तिकडे सगळाच आनंद होता. माझ्या लागीचे म्हणजे खादाडीचे काहीच नव्हते. एका कोपऱ्यावर पाणीपुरी दिसली तेवढीच, पण ती खायची काही इच्छा झाली नाही. सोबतीला आलोक देशपांडे होता. आम्ही आपआपल्या लहान मुलींसाठी बारीकसारीक काही खरेदी केले. तिकडे छान छान दुप्पटे असतात असे सोनिया नारकर म्हणाली म्हणून मृण्मयीसाठी ते एकदोन घेतले. विमानतळावर जाताना मिठाईच्या दुकानाकडे आमची गाडी गेली नाही, पण दुसऱ्या गाडीतून एक मस्त मिठाई आली. एकदम मस्त रवाळ आणि सौम्य गोड अशी होती. टिपिकल राजस्थानी मिठाई असे वर्णन तेव्हा ऐकल्याचे आठवते. त्याचे नाव आता आठवत नव्हते, मग सोनियाला फोन करुन जरा त्रास दिला. गुगल, स्वीगी पाहीले आणि ती थाळ बर्फी असावी किंवा मग अगदीच ती नसेल तर पाटा बर्फी. पण थाळ बर्फीचा फोटो अधिक साध्यर्म दर्शविणारा आहे. असो, पण ती बर्फी दुसऱ्या दिवशी कार्यालयात सर्वानाच आवडली आणि चट्टामट्टा फस्त झाली.

----

थोडे खादाडीच्या पलिकडले  -  भारतातील पहिलं वॉटर म्युझिअम

द्रव्यवतीच्या प्रकल्पाबाबत वेगळे लिहावे लागेल. पण कधीही जयपूरला गेलात तर आवर्जून पाहावी अशी बाब म्हणजे वॉटर म्युझिअम. नदीचा सुरुवातीचा पाच एक किमीचा जंगलातील भाग संपल्यावर शहराच्या जवळच १८६० मध्ये रामसागर धरण बांधण्यात आले, जे १९८१ च्या पूराच्यावेळी फोडावे लागले होते. टाटा प्रोजेक्ट्सच्या द्रव्यवती प्रकल्पानिमित्ताने तेथील सारा राडारोडा, मलबा तीन वर्षांपूर्वी हटविण्यात आला. त्यावेळी एक अनमोल खजिनाच हाती आला. १८९१ सालातील जयपूरला पाणी पुरवठा करणारी पंप हाऊसची चिखलात दबलेली यंत्रसामग्री दिसली. वाफेवर चालणारा पंप आणि वाफ तयार करण्यासाठी बॉयलर सापडले. दोन्ही यंत्र बऱ्यापैकी सुस्थितीत. दोन्हीवर उत्पादक कंपनीचे नाव, लोगो आणि उत्पादन वर्ष कोरलेले. मूळ प्रकल्पात याचा कसलाही उल्लेख नव्हता. पण सामग्रीची स्थिती पाहून हे सर्व राखायचे ठरले. पंप आणि बॉयलर दोन्ही चकाचक करण्यात आले आणि भारतातलं पहिलं वॉटर म्युझिअम अस्तित्वात आले. सोबत त्याकाळात वापरली जाणारी अवजारं, कूपनलिका खोदणारी यंत्रदेखील आहेत.
बॉयरल रुमचं कॅफेमध्ये रुपांतर झालंय. या संदर्भातील अनेक माहितीफलक लावले आहेत. महत्वाचं म्हणजे हे सर्व प्रकल्पाच्या मूळ खर्चात नसलेले
, पण सापडलेला हा ठेवा जोपासायचा या उद्देशाने हे म्युझिअम जन्माला आलं.

 सुहास जोशी

+91 98330 68140

Friday, May 14, 2021

मशिदची खाऊगल्ली

मुंबईत नोकरीला आल्यावर खाऊ गल्लीबद्दल ऐकले होते. पण आजवर कधीच जाणे झाले नाही, पण साधारण २००३ च्या दरम्यान अचानकपण एक वेगळीच खाऊगल्ली सापडली आणि नतंर  अनेकदा इकडे येणे झाले.
तेव्हा युरो आरएससीजी नावाच्या जाहिरात कंपनीत कामाला होतो. मशिद बंदरला एका व्हेडरकडे जायचे होते. रेल्वे स्थानकावरुन बाहेर आलो. आधीच अरुंद रस्ता, त्यातच अनेक विक्रेत्यांनी फुटपाथपण व्यापलेला. होलसेल, रिटेल अशी सर्वाची सरमिसळ असलेला हा भाग. जागा मिळेल त्या कोपऱ्यातून सुसाट दामटवणाऱ्या दुचाकी, कुठे एखाद्या छोट्या टेम्पोतून माल उतरवायची गडबड, तुडुंब भरलेल्या हातगाड्या ओढणारे कष्टकरी असा प्रचंड गोंगाट असलेला तो भाग. मध्य रेल्वेवरच्या मशिद बंदर स्थानकाबाहेरचे हे नेहमीचेच दृश्य.
प्रत्येक गल्लीत एकाच प्रकारच्या जिन्नस विकणारी वीस-पंचवीस दुकाने. स्टेशनजवळचा सारा परिसर ड्राय फ्रुट्स विकणाऱ्यांचा अड्डा. मोठ्या दुकानांच्या जोडीला रस्त्यावरच्या गाड्यादेखील. मध्येच ताडीपत्री विकणारे फुटपाथ अडवून बसलेले. त्या गदारोळातून मला ज्या ठिकाणी जायचे होते, ते शोधत निघालो आणि पाच एक मिनिटात दर्यास्थान स्ट्रीटअशी पाटी लिहलेल्या ठिकाणी येऊन थांबलो. 
इतर गल्ल्यांच्या तुलनेत येथे बरीच शांतता होती. कारण येथे इतर व्यापारी दुकाने नाहीत. मात्र पाच-पंचवीस खाद्यपदार्थांची रेलेचेल असलेले अनेक छोटेमोठे स्टॉल येथे आहेत. अगदी गल्लीच्या तोंडापासूनच यांची सुरुवात होते. याच गल्लीत व्हेंडरचे ऑफीस होते.
संध्याकाळची वेळ असल्याने लवकरात लवकर व्हेंडरकडे पोहचण्याची घाई होती. त्या दिवशी संकष्टी असल्याने त्या खाद्यपदार्थांकडे पाहायचा मोह टाळून कामाकडे लक्ष दिले. (तेव्हा मी चक्क संकष्टी वगैरे करायचो. आता ते सर्वच प्रकार फाट्यावर मारले आहेत). असो, तर काम आवरुन अर्ध्या तासात खाली आलो. दोन मिनिटे विचार केला आणि उपवास वगैरे सर्व मिथ्या आहेयाचा साक्षात्कार झाला. त्या सर्व पदार्थांमध्ये माझ्यासाठी पूर्णत: नवीन असलेला पदार्थ म्हणजे पुडला, लगेचच ऑर्डर दिली.
शेगडीवरच्या चरचरीत तापलेल्या तव्यावर त्या थोर इसमाने पाण्याचा हबका मारुन फडके फिरवले. एका मोठ्या पातेल्यातील बेसनचे वाटीभर मिश्रण अलगदपणे तव्यावर पसरवले. या पीठात हलकासा ओवा चिरडून घातला होता. त्यापाठोपाठ बटरचा एक मोठा तुकडा पसरवला आणि अगदी बारीक (मटण खिम्यासारखा) केलेले आले भुरभुरले. थोडी कोथिंबीर. खरपूस भाजल्यावर बाजू पलटली. अर्ध्या मिनिटात एका प्लेटमध्ये पुडला
, तीन प्रकारच्या चटण्या आणि ब्रेडचा एक स्लाईस हजर. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेड पुडला. यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस पिठात बुडवून तव्यावर भाजले जातात. त्यावर चीज वगैरे, कधी कधी टोमॅटो, सिमला मिर्ची असा थरपण देतात. मी आपला साधा आणि साधा ब्रेड पुडला खाल्ला.
हा पदार्थ पूर्णत: नवीन होता. या सदृश्य दिसणारे टोमॅटो ऑम्लेट माहित होते, पण निव्वळ बेसन पीठाचा हा प्रकार प्रथमच अनुभवला. हा टिपिकल गुजराती पदार्थ. ऐवीतेवी उपवास मोडलाच असल्याने आता एकाच पदार्थावर थांबणे अन्यायकारक ठरले असते. मग प्रत्येक गाड्यावर राऊंड सुरु झाला.  
येथील खिचा पापड हा प्रकार सर्वाधिक आवडला. नेहमीपेक्षा बऱ्याच मोठ्या आकाराचा हा पापड निखाऱ्यावर भाजताना सतत खेचत राहायचा, मग तो चांगला फुलतो आणि मोठ्या भाकरीच्या आकाराचा होतो. सोबत लाल-हिरवी चटणी. ह्यावर बटरचा ब्रश फिरवून चाट मसाला मारून
पण मिळतो. खच्चून कांदा
, टोमॅटो, कोबी, काकडी आणि दणकून शेव टाकून मसाला पापडदेखील मिळतो. (साधा रु. 15, बटर रु. 20 आणि मसाला रु. 30 आता वाढले असतील). हे असे नुसता पापड खाणे हा प्रकार तसा नवीन नव्हता. पण येथील व्यापारी बहुल परिसरात असे पापड 
मिळण्याची अनेक ठिकाणे आहेत. आजोळी नान्नजला लहानपणी ज्वारीच्या कोंड्याचे पापड केले जायचे. ते भाजून/तळून कच्च्या शेंगदाण्याबरोबर खाणे हा सुट्टीतला उद्योग हाच काय तो आत्तापर्यंतचा नुसता पापड खाण्याचा हाच प्रकार माहिती होता.
हा खिचा पापड भला मोठा असतो. तांदूळ, मका आणि सोयाबीन याचे पीठ एकत्र करून केला जातो. याचं नक्की मूळ ठिकाण माहीत नाही. आज तिकडे काम करणारे सर्वच उत्तर भारतीय आहेत. त्यांना याबाबत फारसे माहीत नाही. त्यामुळे याचं मूळ सिंधी, गुजराती की राजस्थानी हे मला अजून माहीत नाही. (खिचा पापडवर समीर कर्वेने ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट लिहली होती. त्यात काही प्रमाणात अर्थकारण आणि इतर माहिती आहे. तीपण वाचावी.)
पापडाच्या स्टॉलजवळच पापडी-जिलेबी पण हादडली. इकडची पापडी आणि बडी गाठीया प्रकार पण जरा वेगळा आहे. बडी गाठीया या एकदम कुरकुरीत न करता थोड्या मऊसर असतात. फाफडा पण असाच थोडा काही ठिकाणी मऊसर असतो. खच्चून मिरी घातलेली असते. मोठा वाडगा भरून मिरी ठेवली होती तिथे. एकदम समोर तळलेा ताजा फाफडा, पापडी आणि जिलेबी मिळते. 
टिपिकल गुजराती प्रकार. सोबत गाजराचे ताजे लोणेचं आणि मिरची. गल्लीच्या अगदी तोंडावर ढोकळा
, खांडवी आणि अळूवडीचा मोठा ढीग लागलेला असतो. येथील अळूवाडी हे केवळ उकडलेली असते. तळलेल्या किंवा परतलेल्या अळूवडीपेक्षा उकडलेली वडी मला अधिक आवडते. नंतर एकदा असाच ठरवून या गल्लीत गेलो.. माफकच खाल्ले, भरपूर फोटो काढले आणि अळूवडी, खांडवी ऑफीसमध्ये नेली.
कच्चा खिचा पापडदेखील विकत मिळतो. फार पूर्वी वजनावर द्यायचे, आता नगावर मिळतो. प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी, झवेरी बाजार, मशिद या भागात केव्हाही कामानिमित्त गेलो की, कच्चे पापड आणि चटण्या पार्सल घ्यायचे. मग ऑफीसमध्ये जाऊन मायक्रोवेव्हमध्ये भाजायचे. त्यामध्ये दरवेळी खेचता यायचे नाही. तेव्हा या पापडाची फेल्ट हॅट तयार व्हायची.
मशिद रेल्वे स्थानकावर दादरच्या दिशेने असलेल्या जिन्याने वर यायचे. रस्त्यावर डावीकडे वळून 5-7 मिनिटे चालले की उजवीकडे सत्कार हॉटेल लागेल, त्याच्यासमोर दर्यास्थान स्ट्रीट असा बोर्ड आहे, तीच गल्ली. येथे मेदू वडा, डोसा, बटाटा वडा, भजी, परोठा छोले आणि लस्सीदेखील मिळते. सध्या कॉर्नरला एक बकवास चायनीजपण आहे. हे आपले आणि त्या गल्लीचे दुर्दैवच.
तर हा पुडला नंतर एकदा झवेरी बाजारच्या पुढे कोणत्यातरी एका गल्लीच्या कोपऱ्यावरदेखील मिळाला. खिचा पापड तर हल्ली अनेक ठिकाणी मिळतो. मध्यंतरी मुलुंडला कोठेतरी पाहील्याचेदेखील आठवते. नुकतेचे युट्यूबवर झवेरीबाजारातील पुडलाचे मोठे दुकानच असल्याचे पाहीले.
सध्या लॉकडाऊनमुळे सुस्तावलो आहे. एकेदिवशी अचानक पुडला आठवला. युट्यूबवर दोनचार रेसिपी पाहिल्या. अनेकांनी पुडलामध्ये कच्च्या भाज्या, चीजवगैरे टाकले होते. पण मला तो नुसता साधा पुडलाच आवडला होता.
लगेहात बेसन कालवले
, त्यात ओवा, थोडी धनेजिरे पावडर, मीठ टाकले. आल्याचे अगदी बारीक (खिम्यासारखे) तुकडे केले, मिरची, कोथिंबीर चिरुन घेतली. एक ब्रेड पुडला केला आणि एक साधा... पीठ थोडेसे घट्ट झाले होते. पण चव जमली होती. आता अगदीच नोकरी, व्यवसायामुळे पोटापाण्याचे हाल झाले तर पुडला गाडा आणि जोडीला खिचा पापड सुरु करता येईल इतका आत्मविश्वास नक्कीच मिळाला आहे...

सुहास जोशी
+91 98330 68140
---समाप्त---    

Thursday, April 22, 2021

जाऊ तिथे खाऊ

एसटीने निरुद्देश भटकंती करत खादाड हा प्रकार मी गेल्या दिड एक वर्षात सुरु झाला. पण त्याशिवाय कामानिमित्त फिरतानादेखील त्या त्या शहरात, गावात, शहराच्या एखाद्या विशिष्ट भागात काहीतरी वेगळे शोधून खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आपोआपच काही ना काही सापडत जाते. मग कधी कुठेतरी कोणीतरी लिहलेले आठवते, तर कधी एखाद्या मित्राशी बोलून नवीन ठिकाण, नवा खाद्यपदार्थ गवसतो. 
कामानिमित्त किंवा असंच कुठंही गेले की मला आपोआपच त्या भागात काय खायला मिळते याचा वास येऊ लागतो. मग ते एखादं प्रसिद्ध ठिकाण असो की शहर असो की आडवाटेचे गाव. कामाबरोरच खादाडी काय करता येईल याची योजना डोक्यात साकारत असते... 
गोरेगाव स्टेशनला उतरलो की मला जिकडे जायचं आहे त्या ठिकाणच्या बस, रिक्षेच्याआधी तिकडचा फेमस जिलेबीचा गाडा दिसतो. डोंबिवलीला उतरलो की अप्पम कुठ कुठं मिळते ती ठिकाणं आधी आठवतात, मग बाकीचं. मालाड पश्चिमेला असलेली मिठाई, नमकीन, चाट मिळणारी भली मोठी दुकानं आठवतात. मशिद, काळबादेवीला खिचा पापड, फराळी पॅटीस असं समोर येते. कुरुंदवाड, सांंगली, कोल्हापूरातून मिसळ न खाता मी बाहेरच पडत नाही. मध्ये एकदा ग्रॅन्टरोडला एका स्टोरीसाठी गेलो तेव्हा पश्चिमेला एक अस्सल गोमंतंक हॉटेल दिसले, जेवायची वेळ होतीच, मग पोटभर गोमंतकीय पदार्थांचा आस्वाद घेतला. लालबागला जयंत भेळपुरी अशी एक ना दोन, ही यादी न संपणारी आहे. यातील काही ठिकाणं ही ठरवून खायला जावं अशी असतात, पण तसे दरवेळी जमेलच असे नाही. मग कामाच्या निमित्ताने ही संधी चालूनच येते.
पर्टनस्थळी तर हाताशी वेळ असतोच, तेव्हा तेथे तर अगदी ठरवून शोध घेतला जातो. 
यातूनच कधी कधी काही अगदी ठरुनच जाते. मुंबई/ठाण्यातून कोणताही घाट चढून देशावर पोहचलो की, 'मटणच खायचंं' असे मला आता डॉक्टरांनीच सांगितलं आहे. त्यामुळे पुणे, नाशिक या ठिकाणी केवळ नाश्त्यापुरताच शाकाहार असतो. नाशिक, पुणे, कुरुंदवाड, सांगली, मिरज येथील अनेक खानावळी धुंडाळून झाल्या आहेत.  
असो,
तर त्यातूनच बरंच काही जमा होत गेलं. पूर्वी स्मार्ट फोन नव्हता. त्यामुळे छायाचित्रांचा तसा दुष्काळच, पण खादाडी मात्र जोरात असायची. रमजान मधील एखादी खाद्य भटकंती डिएसएलआर घेऊन झाली पण तो एकच काय तो प्रयोग. आता स्मार्टफोन आल्यावर नव्याने काही जुन्या ठिकाणांना मुद्दाम भेट दिली जाते. त्यातून खंडीभर छायाचित्रे जमा झाली आहेत. फेसबुकवर पण बरंच लिहून ठेवलंय.
त्यातूनच जसे जमेल तसे काही प्रमाणात का होईना संकलन करावे असे ठरवलंय. बघू कसे जमते ते. मध्यंतरी अंधेरी पूर्वेला एकेठिकाणी एकदम ऑफबीट साबुदाणा खिचडी खाल्ली. 'साँवरीया खिचडी'. त्यावेळच्या पोस्टवर अमित सामंत या माझ्या पक्क्या खव्वय्या मित्राने यावर 'जाऊ तेथे खाऊ' अशी टिप्पणी केली. त्यामुळे ब्लॉगला हेच नाव दिलंय.
या पोस्टसाठी कोणत्याही एका पदार्थाचा फोटो न टाकता, मु्द्दामच रिकामी प्लेट ठेवली. आहे. कारण जेथे जाऊ तेथे त्या त्या ठिकाणी जे जे उत्तम असेल ते खायचे हाच आपला फंडा आहे. तर येत्या काही दिवसात या ब्लॉगद्वारे या प्लेटमध्ये नवनवीन पदार्थ ट्राय करुया.. 

हॅप्पी खादाडी
सुहास जोशी
+91 9833068140