Monday, May 31, 2021

राजस्थानी छाछ राबडी आणि कढी कचोरी

जयपूरला जाऊन इतकेच कसे काय खाऊन आलात असाच प्रश्न पडला असेल ना? पण काय करणार पर्यायच नव्हता. इनमिन 24 तास पण नव्हतो. त्यात सात-आठ तास झोपेत गेले. उरलेला वेळ ज्या कामासाठी गेलो होतो त्यामागे गेला. गेला बाजार तास-दिड तास तेवढा मिळाला. तेवढ्या वेळातच भटकून थोडेफार गिळता आले.

तर, जून 2019 ला टाटा प्रोजेक्ट्सच्या एका प्रकल्पाच्या निमित्ताने एक दिवसाचा जयपूर दौरा होता. जेट एअरवेज बंद झाल्यानंतर मुंबई-जयपूर मार्गावरची सकाळची उड्डाणे बंद झाली होती, त्यामुळे आदल्या दिवशी संध्याकाळी निघून मुक्कामी जयपूर गाठणे क्रमप्राप्त होते. तसे निघालो. मोजून चारच पत्रकार होतो. मुक्कामाची सोय द ललितमध्ये होती. त्यादिवशी हॉटेलात एक लग्नदेखील होते. नुसता झगमगाट आणि नाचगाणी सुरु होती. पोहचायला उशिर झाल्याने बाहेर कुठे फिरणे शक्य नव्हते. हॉटेलातच जे काही होते ते गिळून गप्प पडलो. पण पंचतारांकित हॉटेलातील बंदीस्त वातानुकुलित खोलीत, अति गुबगुबीत गाद्या मला टोचतात. पहाटे लवकरच जाग आली. पटापट आंघोळ उरकली आणि भल्या सकाळीच बाहेर पडलो.

कढी-कचोरी

हॉटेलसमोरचा चार-सहा पदरी रस्ता पार करुन सरळ चालत सुटलो. पावसाचे आगमन लांबले असल्यानेच सकाळीदेखील चांगलेच गरम होत होते. शाळा शिकवणीला सायकल, बसने जाणारी मुले. अगदी डब्बा झालेल्या बसमध्ये कामावर जाणाऱ्यांची रेटारेटी अशी कोणत्याही शहरात असणारी टिपिकल दृश्य येथेपण होती.

छोट्या शहरात असतात तशी स्वतंत्र बंगला टाईप घरांची रांग होती. मर्यादीत का असेना झाडांची सोबत होती. एका चौकात रिक्षावाल्यांची रांग दिसली म्हणून मग जरा खादाडीची चौकशी केली. जवळच्याच एका चौकात बरेच गाडे असल्याचे कळले. त्या चौकात पोहचल्यावर पाहीले तर खरेच चांगलीच गर्दी होती. त्यातच दो बोटी चार रोटी 70 रु. या फलकाने लक्ष वेधून घेतले. पण त्या फलकाच्या वरच गॅरेजचा पण बॅनर होता. आणि आतमध्ये हॉटेलची लगबग फारशी दिसत नव्हती. इकडे खाल्ले तर पुढे काहीच खाता आले नसते. त्यामुळे तो मोह जरा आवरला. 

कोपऱ्यातल्या एका गाड्यावर दाल-पक्वानमधील पक्वानचा ढीग लागला होता. तेथूनच सुरुवात केली. मुगाची घट्ट डाळ, चटणी, मिरची आणि कांदा. चव काही फार ग्रेट नव्हती, पण तेवढेच सुरुवातील ठिक होते. मघाशी चालताना सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा प्रकार म्हणजे कचोरी. दोन तीन दुकानात भल्या मोठ्या कढईत कचोरी तळताना पाहीली होती. सकाळसकाळी कचोरीचे घाण्यावर घाणे निघत होते. मुंबई आणि महानगर परिसरात कोणत्याही रस्त्यावर फिरताना वडा-पाव दिसतो, तसेच हे कचोरी प्रकरण वाटू लागले.

आता या चौकात पण्डितजी चाय व कढी कचोरीवाले असा मोठा बोर्डच एका झाडावर टांगला होता. दोन मोठ्या झाड्यांच्या सावलीत एका अति छोट्या गाळ्याच्या बाहेर काचेच्या पेटीत कचोरी आणि मिरची भजी/वडे भरुन ठेवल्या होत्या. येथे नुसती कचोरी खाणारे कमीच. आधी तिचे बारीक तुकडे करायचे आणि मग प्याज कचोरी किंवा मग कढी कचोरी हे कॉम्बिनेशन ठरलेले. गरमागरम कढीत आकंठ बुडालेली कचोरी, वर गोड चटणी आणि कांदा. कढी पुन्हा मिळायची सोय आहेच. एकदोनदा कुरुंदवाड-सांगली रस्त्यावर अंकलीला कढी-वडा आणि नांदेडला कढी भजी खाल्ली होती. पण त्याव्यतिरिक्त इतक्या सकाळी कढी
कधीच खाल्ली नव्हती. जयपूरच्या त्या चौकात तर कढी-कचोरीसारखेच, कढी-मिरची वडा सदृश्य भजी असे कॉम्बिनेशन पण होते. त्या मोठ्या कचोरीचे आणि मिरचीचे तुकडे करण्यासाठी ते पंडितजी चक्क कात्रीच वापरत होते. बाकी सारे वातावरण अगदी टपरीवरचेच होते आणि बिलासाठी पंडितजींकडे पेटीएमची सुविधा पण होती.

एव्हाना बरेच तेलकट, तिखट खादाडून झाल्याने त्यावरचा उपाय अपेक्षित होता. तो तेथेच कोपऱ्यावर उभा होता. प्रो. कन्हैयालाल सैनी यांचा राजस्थानी छाछ राबडीचा गाडा. त्यावर इतके वेगवेगळे काय काय लिहले होते त्याने साहजिकच लक्ष वेधून घेतले. नींबू की शिकंजी, कैरी की छाछ वगैरे होते.

पण मला त्या छाछ राबडीचीच चव पाहायची होती. ते कन्हैयालाल त्यांच्या खास ढंगात माहीती सांगू लागले. त्यातून उमलगले ते असे, छाछ राबडी हा ज्वारी किंवा मक्याच्या कण्यापासून तयार केलेला पदार्थ. ज्वारीच्या कण्या शिजवून त्यात ताक, चाट मसाला, तिखट आणि मीठ घालून घुसळले जाते. मध्यम आकाराचा ग्लास 10 रुपयाला. घट्टसर अशी ही छाछ राबडी एक दोन ग्लास प्यायली की दुपारपर्यंत बघायलाच नको. खरे तर हा अगदी अस्सल घरगुती प्रकार आहे. लहानपणी एकदोनदा घरी मुद्दाम केलेल्या ताककण्या यावेळी आठवल्या. गरीबांचे खाद्य म्हणूनही काहीसे लहानपणी ऐकले होते. आता तेच 10 रुपयाला ग्लासभर मिळत होते.

पण हे प्रकरण भारी होते. आता गरगरीत झाले आणि परत हॉटेलात जाऊन चेकआऊटपूर्वी तिकडच्या नाश्त्यावर पण हात मारायचा होताच. त्यामुळे सरळ रिक्षा पकडली आणि हॉटेल गाठले.

संध्याकाळी चारपर्यंत द्रव्यवती नदीच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प पाहण्यात गेला. मध्येच जेवण झाले पण ते टिपिकल कॉर्पोरेट वर्क लंच टाईप होते. संध्याकाळी एक-दिड तास शिल्लक होता म्हणून तिकडच्या प्रसिद्ध बाजारपेठेत नेण्यात आले. तिकडे सगळाच आनंद होता. माझ्या लागीचे म्हणजे खादाडीचे काहीच नव्हते. एका कोपऱ्यावर पाणीपुरी दिसली तेवढीच, पण ती खायची काही इच्छा झाली नाही. सोबतीला आलोक देशपांडे होता. आम्ही आपआपल्या लहान मुलींसाठी बारीकसारीक काही खरेदी केले. तिकडे छान छान दुप्पटे असतात असे सोनिया नारकर म्हणाली म्हणून मृण्मयीसाठी ते एकदोन घेतले. विमानतळावर जाताना मिठाईच्या दुकानाकडे आमची गाडी गेली नाही, पण दुसऱ्या गाडीतून एक मस्त मिठाई आली. एकदम मस्त रवाळ आणि सौम्य गोड अशी होती. टिपिकल राजस्थानी मिठाई असे वर्णन तेव्हा ऐकल्याचे आठवते. त्याचे नाव आता आठवत नव्हते, मग सोनियाला फोन करुन जरा त्रास दिला. गुगल, स्वीगी पाहीले आणि ती थाळ बर्फी असावी किंवा मग अगदीच ती नसेल तर पाटा बर्फी. पण थाळ बर्फीचा फोटो अधिक साध्यर्म दर्शविणारा आहे. असो, पण ती बर्फी दुसऱ्या दिवशी कार्यालयात सर्वानाच आवडली आणि चट्टामट्टा फस्त झाली.

----

थोडे खादाडीच्या पलिकडले  -  भारतातील पहिलं वॉटर म्युझिअम

द्रव्यवतीच्या प्रकल्पाबाबत वेगळे लिहावे लागेल. पण कधीही जयपूरला गेलात तर आवर्जून पाहावी अशी बाब म्हणजे वॉटर म्युझिअम. नदीचा सुरुवातीचा पाच एक किमीचा जंगलातील भाग संपल्यावर शहराच्या जवळच १८६० मध्ये रामसागर धरण बांधण्यात आले, जे १९८१ च्या पूराच्यावेळी फोडावे लागले होते. टाटा प्रोजेक्ट्सच्या द्रव्यवती प्रकल्पानिमित्ताने तेथील सारा राडारोडा, मलबा तीन वर्षांपूर्वी हटविण्यात आला. त्यावेळी एक अनमोल खजिनाच हाती आला. १८९१ सालातील जयपूरला पाणी पुरवठा करणारी पंप हाऊसची चिखलात दबलेली यंत्रसामग्री दिसली. वाफेवर चालणारा पंप आणि वाफ तयार करण्यासाठी बॉयलर सापडले. दोन्ही यंत्र बऱ्यापैकी सुस्थितीत. दोन्हीवर उत्पादक कंपनीचे नाव, लोगो आणि उत्पादन वर्ष कोरलेले. मूळ प्रकल्पात याचा कसलाही उल्लेख नव्हता. पण सामग्रीची स्थिती पाहून हे सर्व राखायचे ठरले. पंप आणि बॉयलर दोन्ही चकाचक करण्यात आले आणि भारतातलं पहिलं वॉटर म्युझिअम अस्तित्वात आले. सोबत त्याकाळात वापरली जाणारी अवजारं, कूपनलिका खोदणारी यंत्रदेखील आहेत.
बॉयरल रुमचं कॅफेमध्ये रुपांतर झालंय. या संदर्भातील अनेक माहितीफलक लावले आहेत. महत्वाचं म्हणजे हे सर्व प्रकल्पाच्या मूळ खर्चात नसलेले
, पण सापडलेला हा ठेवा जोपासायचा या उद्देशाने हे म्युझिअम जन्माला आलं.

 सुहास जोशी

+91 98330 68140

No comments:

Post a Comment