Friday, May 14, 2021

मशिदची खाऊगल्ली

मुंबईत नोकरीला आल्यावर खाऊ गल्लीबद्दल ऐकले होते. पण आजवर कधीच जाणे झाले नाही, पण साधारण २००३ च्या दरम्यान अचानकपण एक वेगळीच खाऊगल्ली सापडली आणि नतंर  अनेकदा इकडे येणे झाले.
तेव्हा युरो आरएससीजी नावाच्या जाहिरात कंपनीत कामाला होतो. मशिद बंदरला एका व्हेडरकडे जायचे होते. रेल्वे स्थानकावरुन बाहेर आलो. आधीच अरुंद रस्ता, त्यातच अनेक विक्रेत्यांनी फुटपाथपण व्यापलेला. होलसेल, रिटेल अशी सर्वाची सरमिसळ असलेला हा भाग. जागा मिळेल त्या कोपऱ्यातून सुसाट दामटवणाऱ्या दुचाकी, कुठे एखाद्या छोट्या टेम्पोतून माल उतरवायची गडबड, तुडुंब भरलेल्या हातगाड्या ओढणारे कष्टकरी असा प्रचंड गोंगाट असलेला तो भाग. मध्य रेल्वेवरच्या मशिद बंदर स्थानकाबाहेरचे हे नेहमीचेच दृश्य.
प्रत्येक गल्लीत एकाच प्रकारच्या जिन्नस विकणारी वीस-पंचवीस दुकाने. स्टेशनजवळचा सारा परिसर ड्राय फ्रुट्स विकणाऱ्यांचा अड्डा. मोठ्या दुकानांच्या जोडीला रस्त्यावरच्या गाड्यादेखील. मध्येच ताडीपत्री विकणारे फुटपाथ अडवून बसलेले. त्या गदारोळातून मला ज्या ठिकाणी जायचे होते, ते शोधत निघालो आणि पाच एक मिनिटात दर्यास्थान स्ट्रीटअशी पाटी लिहलेल्या ठिकाणी येऊन थांबलो. 
इतर गल्ल्यांच्या तुलनेत येथे बरीच शांतता होती. कारण येथे इतर व्यापारी दुकाने नाहीत. मात्र पाच-पंचवीस खाद्यपदार्थांची रेलेचेल असलेले अनेक छोटेमोठे स्टॉल येथे आहेत. अगदी गल्लीच्या तोंडापासूनच यांची सुरुवात होते. याच गल्लीत व्हेंडरचे ऑफीस होते.
संध्याकाळची वेळ असल्याने लवकरात लवकर व्हेंडरकडे पोहचण्याची घाई होती. त्या दिवशी संकष्टी असल्याने त्या खाद्यपदार्थांकडे पाहायचा मोह टाळून कामाकडे लक्ष दिले. (तेव्हा मी चक्क संकष्टी वगैरे करायचो. आता ते सर्वच प्रकार फाट्यावर मारले आहेत). असो, तर काम आवरुन अर्ध्या तासात खाली आलो. दोन मिनिटे विचार केला आणि उपवास वगैरे सर्व मिथ्या आहेयाचा साक्षात्कार झाला. त्या सर्व पदार्थांमध्ये माझ्यासाठी पूर्णत: नवीन असलेला पदार्थ म्हणजे पुडला, लगेचच ऑर्डर दिली.
शेगडीवरच्या चरचरीत तापलेल्या तव्यावर त्या थोर इसमाने पाण्याचा हबका मारुन फडके फिरवले. एका मोठ्या पातेल्यातील बेसनचे वाटीभर मिश्रण अलगदपणे तव्यावर पसरवले. या पीठात हलकासा ओवा चिरडून घातला होता. त्यापाठोपाठ बटरचा एक मोठा तुकडा पसरवला आणि अगदी बारीक (मटण खिम्यासारखा) केलेले आले भुरभुरले. थोडी कोथिंबीर. खरपूस भाजल्यावर बाजू पलटली. अर्ध्या मिनिटात एका प्लेटमध्ये पुडला
, तीन प्रकारच्या चटण्या आणि ब्रेडचा एक स्लाईस हजर. दुसरा प्रकार म्हणजे ब्रेड पुडला. यामध्ये ब्रेडचे दोन स्लाइस पिठात बुडवून तव्यावर भाजले जातात. त्यावर चीज वगैरे, कधी कधी टोमॅटो, सिमला मिर्ची असा थरपण देतात. मी आपला साधा आणि साधा ब्रेड पुडला खाल्ला.
हा पदार्थ पूर्णत: नवीन होता. या सदृश्य दिसणारे टोमॅटो ऑम्लेट माहित होते, पण निव्वळ बेसन पीठाचा हा प्रकार प्रथमच अनुभवला. हा टिपिकल गुजराती पदार्थ. ऐवीतेवी उपवास मोडलाच असल्याने आता एकाच पदार्थावर थांबणे अन्यायकारक ठरले असते. मग प्रत्येक गाड्यावर राऊंड सुरु झाला.  
येथील खिचा पापड हा प्रकार सर्वाधिक आवडला. नेहमीपेक्षा बऱ्याच मोठ्या आकाराचा हा पापड निखाऱ्यावर भाजताना सतत खेचत राहायचा, मग तो चांगला फुलतो आणि मोठ्या भाकरीच्या आकाराचा होतो. सोबत लाल-हिरवी चटणी. ह्यावर बटरचा ब्रश फिरवून चाट मसाला मारून
पण मिळतो. खच्चून कांदा
, टोमॅटो, कोबी, काकडी आणि दणकून शेव टाकून मसाला पापडदेखील मिळतो. (साधा रु. 15, बटर रु. 20 आणि मसाला रु. 30 आता वाढले असतील). हे असे नुसता पापड खाणे हा प्रकार तसा नवीन नव्हता. पण येथील व्यापारी बहुल परिसरात असे पापड 
मिळण्याची अनेक ठिकाणे आहेत. आजोळी नान्नजला लहानपणी ज्वारीच्या कोंड्याचे पापड केले जायचे. ते भाजून/तळून कच्च्या शेंगदाण्याबरोबर खाणे हा सुट्टीतला उद्योग हाच काय तो आत्तापर्यंतचा नुसता पापड खाण्याचा हाच प्रकार माहिती होता.
हा खिचा पापड भला मोठा असतो. तांदूळ, मका आणि सोयाबीन याचे पीठ एकत्र करून केला जातो. याचं नक्की मूळ ठिकाण माहीत नाही. आज तिकडे काम करणारे सर्वच उत्तर भारतीय आहेत. त्यांना याबाबत फारसे माहीत नाही. त्यामुळे याचं मूळ सिंधी, गुजराती की राजस्थानी हे मला अजून माहीत नाही. (खिचा पापडवर समीर कर्वेने ऑक्टोबर 2012 मध्ये फेसबुकवर एक भली मोठी पोस्ट लिहली होती. त्यात काही प्रमाणात अर्थकारण आणि इतर माहिती आहे. तीपण वाचावी.)
पापडाच्या स्टॉलजवळच पापडी-जिलेबी पण हादडली. इकडची पापडी आणि बडी गाठीया प्रकार पण जरा वेगळा आहे. बडी गाठीया या एकदम कुरकुरीत न करता थोड्या मऊसर असतात. फाफडा पण असाच थोडा काही ठिकाणी मऊसर असतो. खच्चून मिरी घातलेली असते. मोठा वाडगा भरून मिरी ठेवली होती तिथे. एकदम समोर तळलेा ताजा फाफडा, पापडी आणि जिलेबी मिळते. 
टिपिकल गुजराती प्रकार. सोबत गाजराचे ताजे लोणेचं आणि मिरची. गल्लीच्या अगदी तोंडावर ढोकळा
, खांडवी आणि अळूवडीचा मोठा ढीग लागलेला असतो. येथील अळूवाडी हे केवळ उकडलेली असते. तळलेल्या किंवा परतलेल्या अळूवडीपेक्षा उकडलेली वडी मला अधिक आवडते. नंतर एकदा असाच ठरवून या गल्लीत गेलो.. माफकच खाल्ले, भरपूर फोटो काढले आणि अळूवडी, खांडवी ऑफीसमध्ये नेली.
कच्चा खिचा पापडदेखील विकत मिळतो. फार पूर्वी वजनावर द्यायचे, आता नगावर मिळतो. प्रिन्सेस स्ट्रीट, काळबादेवी, झवेरी बाजार, मशिद या भागात केव्हाही कामानिमित्त गेलो की, कच्चे पापड आणि चटण्या पार्सल घ्यायचे. मग ऑफीसमध्ये जाऊन मायक्रोवेव्हमध्ये भाजायचे. त्यामध्ये दरवेळी खेचता यायचे नाही. तेव्हा या पापडाची फेल्ट हॅट तयार व्हायची.
मशिद रेल्वे स्थानकावर दादरच्या दिशेने असलेल्या जिन्याने वर यायचे. रस्त्यावर डावीकडे वळून 5-7 मिनिटे चालले की उजवीकडे सत्कार हॉटेल लागेल, त्याच्यासमोर दर्यास्थान स्ट्रीट असा बोर्ड आहे, तीच गल्ली. येथे मेदू वडा, डोसा, बटाटा वडा, भजी, परोठा छोले आणि लस्सीदेखील मिळते. सध्या कॉर्नरला एक बकवास चायनीजपण आहे. हे आपले आणि त्या गल्लीचे दुर्दैवच.
तर हा पुडला नंतर एकदा झवेरी बाजारच्या पुढे कोणत्यातरी एका गल्लीच्या कोपऱ्यावरदेखील मिळाला. खिचा पापड तर हल्ली अनेक ठिकाणी मिळतो. मध्यंतरी मुलुंडला कोठेतरी पाहील्याचेदेखील आठवते. नुकतेचे युट्यूबवर झवेरीबाजारातील पुडलाचे मोठे दुकानच असल्याचे पाहीले.
सध्या लॉकडाऊनमुळे सुस्तावलो आहे. एकेदिवशी अचानक पुडला आठवला. युट्यूबवर दोनचार रेसिपी पाहिल्या. अनेकांनी पुडलामध्ये कच्च्या भाज्या, चीजवगैरे टाकले होते. पण मला तो नुसता साधा पुडलाच आवडला होता.
लगेहात बेसन कालवले
, त्यात ओवा, थोडी धनेजिरे पावडर, मीठ टाकले. आल्याचे अगदी बारीक (खिम्यासारखे) तुकडे केले, मिरची, कोथिंबीर चिरुन घेतली. एक ब्रेड पुडला केला आणि एक साधा... पीठ थोडेसे घट्ट झाले होते. पण चव जमली होती. आता अगदीच नोकरी, व्यवसायामुळे पोटापाण्याचे हाल झाले तर पुडला गाडा आणि जोडीला खिचा पापड सुरु करता येईल इतका आत्मविश्वास नक्कीच मिळाला आहे...

सुहास जोशी
+91 98330 68140
---समाप्त---    

25 comments:

  1. मस्त वर्णन . रस्त्यावर मिळणारे पदार्थ घरी करुन खाणे हा त्यापदार्थावर अन्याय आहे . त्या पदार्थाच्या चवीत तिथल्या वातावरणाचा आणि कळकटपणाचा मोठा वाटा असतो . तो घरी जमत नाही .

    ReplyDelete
    Replies
    1. रस्त्यावर किंवा हाँटेलमध्ये आपण पैसे देऊन खातो त्यामुळे पोट भरले तरीही एकेक पदार्थ थोडाथोडा खातो म्हणून चव लागते अन्यथा घरी आपण मुबलक करतो व कंटाळा येईपर्यंत हादडतो.

      Delete
    2. हे भारी निरिक्षण

      Delete
  2. व्वा! Try करायला हवं! अजून येउदेत

    ReplyDelete
  3. लय भारी सुहास, सगळे पदार्थ डोळ्यासमोर उभे राहतात. परळला राहायचो तेव्हा या अशा खाऊ गल्ल्या मध्ये बरीच खादाडी केली आहे.

    ReplyDelete
  4. Mastch. Sagale suralit zale ki gheun jal ekda.

    ReplyDelete
  5. लै भारी....टाकत राहा...

    ReplyDelete
  6. अप्रतिम माहिती धन्यवाद

    ReplyDelete
  7. उत्कृष्ठ ऑबजर्वेशन, पदार्थाची चव तोंडाने घेतात, तुम्ही तर डोळ्यांनीही घेतलीत. आणि खरोखरच असे पदार्थ समोर असतील तर सगळे उपास तापास फाट्यावर मारावे लागतात. खूप छान, लय भारी.

    ReplyDelete
  8. लॉक डाऊन मध्ये जेथे जाणे शक्य नाही अशा ठिकाणचे ब्लॉग लिहून नागरिकांना तिथे जाण्यासाठी उकासावणे, हा आपत्कालीन व्यवस्थापन कायद्याखाली गंभीर गुन्हा आहे.
    असे पदार्थ घरबसल्या कसे प्राप्त होतील याची माहिती कळवा.

    ReplyDelete
  9. मुंबईत कष्टाने फिरून अनुभव घेऊन लिहिलेला लेख चांगला आहे

    ReplyDelete
  10. मस्त लेख लिहिला आहे. फिरतं फिरात खाऊ.....

    ReplyDelete
  11. वा, नवा पदार्थ सापडला तुमच्यामुळे. तो भागच एकूण खाण्यापिण्यासाठी प्रसिद्ध आहे. तुम्ही गाडी टाकलीत की कळवा आम्हाला

    ReplyDelete
  12. मस्त ताेंडाला पाणी सुटेल असा ब्लाँग , जरा लाँकडाऊन उठला की तू खाद्य सफरी आयाेजीत कर, का गाडीवाल्याच्या पाेटावर पाय आणताेस , असाच खात लहा , फिरत रहा , पचवत रहा आणि लिहीत रहा ☺👍

    ReplyDelete
  13. मी खाद्य प्रकारातील जाणकार नाही, पण तुझे हे "पुडला व खिंचा पापड" वाचून जीभ चाळवली गेली. कधी त्या भागात जाणे झाले तर मीही त्याचा आस्वाद घेईन.छान लिहिलं आहेस.

    ReplyDelete
  14. खिचा पापड हा हल्ली बार🍻 मधला most demanded पदार्थ आहे.
    अर्थात ते खेचून करतात की थेट readymade आणून भाजतात (बहुधा तळलेलाच असतो) याचा शोध घेतला नाही.

    मला आठवते मी घाटकोपरला राहायला असताना आजूबाजूला पूर्ण गुजराथी लोक होते.
    मे महिन्यात पापड लोणची करताना तांदळाच्या उकड पिठापासून पापड तयार केले जायचे. त्या उकडलेल्या पिठाच्या गोळ्याला *"खिची"* असे म्हणायचे.
    आम्ही मुलं तर ते गोळे कच्चे च खायचो (म्हणजे उकडलेले असायचेच) त्यात जिरे आणि मीठ असल्याने एक वेगळी चव लागायची.


    सांगितले, कारण खिचा पापड ह्या शब्दाचा आणि त्या पदार्थाचा उगम कदाचित सापडेल

    ReplyDelete
  15. अशीच नवीन ठिकाण, त्यांची माहीती आणी पदार्थांची सुद्धा, शोधून आम्हांलाही
    कळवत रहा, खाण्याचे योग येतील तेव्हा मज्जा असेल, पण ब्लॉग वाचून आणी
    फोटो पाहून सुद्धा मन आणी पोट दोन्ही भरले, मस्तच 👌👍🙂

    ReplyDelete
  16. पुढच्यावेळी मुंबईत पंचवटी एक्स्प्रेस ने आलो कि दर्यास्थान स्ट्रीट नक्कीच जाणार

    ReplyDelete